नाल्याच्या कामाच्या पाहणीवेळी जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला समोरासमोर; आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण

Spread the love

नाल्याच्या कामाच्या पाहणीवेळी जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला समोरासमोर; आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – ठाण्यात राबोडी येथील क्रांतीनगर नाल्याच्या कामाच्या पाहणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आमनेसामने आले. एकेकाळी एकाच पक्षात असलेले हे दोन नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कट्टर विरोधक झाल्याने याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या कामावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. ठाण्यात पावसाळापूर्व कामांवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. राबोडी येथे क्रांतीनगर नाल्याच्या सफाईचे काम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे स्थानिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आव्हाड या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी नजीब मुल्ला हेही तेथे पोहोचले. आव्हाड त्यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई व स्थानिक नागरिकांसोबत नाल्याची पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मुल्ला यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत घोषणाबाजी रोखली. तर, आधी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया घ्या नंतर माझी प्रतिक्रिया घ्या, असे मुल्ला यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

राबोडी परिसरातील नाल्यावरील पुलाच्या बांधकामांचा राडारोडा नाल्यात टाकल्यामुळे खाडी आणि नाल्यामधील सामायिक ओढा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळेच नालेसफाईचे तीनतेरा वाजले असून ठाणेकरांचा कराचा पैसा कळव्याच्या खाडीत वाहून जात आहे,’ असा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला. गेल्या चार वर्षांपासून याठिकाणी काम सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले ही वस्तुस्थिती असून याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या नाल्याची रुंदी वाढवण्यासोबतच येथे रस्ता तयार करण्याचेही काम सुरू आहे. नशिबाने निवडून आलेल्या आमदारांनी आम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवू नयेत’, असा टोला यावेळी मुल्ला यांनी आव्हाड यांचे नाव न घेता लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon