मुंबईसह ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सुरू; कोरोनामुळे ठाण्यात तरुणाचा बळी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंबईसह ठाण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यातच मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ठाणे शहर कोरोनाच्या सावटाखाली पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथे राहणारा वसीम सय्यद (२१) हा मधुमेह आजाराने त्रस्त होता. त्याच्या रक्तातील साखर अनियंत्रित होत नसल्याने त्याला त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे इन्फेक्शन झाले होते. त्याची चाचणी केली असता कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे त्याला गुरुवारी २२ मे ला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात त्याला ठेवण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती चिंताजनक झाली आणि शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यासोबतच कळवा रुग्णालयातील कोविड कक्षात आणखी एक गर्भवती महिला कोरोनाचा उपचार घेत आहे. तिच्या अंगातील ताप आता कमी झाला असून तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता प्रकाश बोरुडे यांनी दिली आहे.
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २३ मे ला राज्यात ४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत ३५ रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १८५ वर पोहोचली आहे. तर रुग्णसंख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढणार आहे. मे महिन्यापासून मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.