विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट; प्रवेशद्वारावर धुराचं साम्राज्य, परिसरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सोलापुरात टॉवेलच्या कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या विधान भवन परिसरात सोमवारी अचानक धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारच्या वेळी अचानक सर्वत्र धूर बघायला मिळाला. यामुळे सर्वांना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली असं वाटलं. पण ही आग लागली नसल्याची माहिती नंतर समोर आली. दरम्यान, परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य बघायला मिळालं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेनंतर तातडीने प्रशासन अलर्ट झालं. हा परिसर अतिमहत्त्वाचा आणि संवेदनशील असा परिसर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इथे सर्व काळजी घेतली जाते. असं असतानाही सोमवारी विधान भवन परिसरात अशाप्रकारचं धुराचं साम्राज्य निर्माण झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. नेमकं काय घडलं? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
विधान भवनात सोमवारी काही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारही उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदारांच्या जेवणाची देखील इथे व्यवस्था केलेली होती. त्यामुळे सर्व आमदार जेवणासाठी मार्गस्थ झाले होते. या दरम्यान अचानक परिसरात धुराचं साम्राज्य बघायला मिळालं. याच वेळी विधान परिसरात बाहेरच्या दिशेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आले. त्यांनी माध्यमांना नेमकं काय घडलं आहे याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाली. यामुळे तिथून धूर निघायला लागला. हा धूर सर्वत्र पसरायला लागला. त्यामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झालं. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली. धूर बंद व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पाचरण करण्यात आल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील घटनेबाबत माध्यमांना माहिती दिली. “विधान भवनाच्या रिसेप्शन एरियात जी स्कॅनिंग मशीन असते, त्यात शॉर्ट सक्रिट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागली आहे. ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील येत आहेत. आग विझवण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आता अग्निशामक दलाच्या गाड्या येऊन तपासणी करणार आहेत”, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली.