पुण्यात एअरफोर्सच्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या; हवाई दलाचा अधिकारी म्हणून करत होता फसवणूक, तपास यंत्रणांनी घरातच केले जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्या सारख्या सांस्कृतिक शहरात बनावट भारतीय हवाई दलाचा जवान असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दक्षिणी कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स विभाग आणि खराडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आहे. बनावट पोशाख परिधान करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या या संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी रविवारी या घटनेची अधिकृत माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव दिनेश कुमार नावाच्या एका व्यक्तीबाबत गुप्तचर यंत्रणेला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईची योजना आखली. त्यानुसार, १८ मे रोजी रात्री दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत पुण्याच्या खराडी परिसरातून गौरव दिनेश कुमार याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याच्याकडून हवाई दलाच्या जवानाची बनावट ओळख पटली आहे.
पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपीच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरले जाणारे हवाई दलाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये हवाई दलाचे दोन टी-शर्ट, एक कॉम्बॅट पॅन्ट, एक जोडी कॉम्बॅट शूज, दोन बॅजेस आणि एक ट्रॅक सूट यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. तो नेमका कोणत्या हेतूने हवाई दलाच्या जवानाची बतावणी करत होता आणि या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका निर्माण झाला आहे का? याचा तपास केला जात आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सजग झाली आहे. या प्रकरणासंबंधी आणखी माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
याबाबत पुणे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले की, हवाई दलाचा पोशाख घालून गौरव हा अनेकांची दिशाभूल करत होता. खराडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती एक व्यक्ती हवाई दलात असल्याचे सांगून फसवणूक करत आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर नजर ठेवली होती. मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्याच्याकडून एअरफोर्सचा पोशाख, शुज, असं साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे. तो पुण्यातील खराडीमध्ये वास्तव्यास होता. मूळचा तो उत्तर प्रदेशमधील आहे. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का? याबाबत तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.