दहिसरच्या गणपत पाटील झोपडपट्टीत तुफान हाणामारी, तिघांचा मृत्यू

Spread the love

दहिसरच्या गणपत पाटील झोपडपट्टीत तुफान हाणामारी, तिघांचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दहिसरच्या एमएचबी पोलीस ठाणे हद्दीतील गणपत पाटील नगर झोपडपट्टी परिसरात सायंकाळी उशिरा दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गणपत पाटील नगरमधील गल्ली क्रमांक १४ येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. माहितीनुसार, शेख व गुप्ता कुटुंबांमध्ये २०२२ पासून वैमनस्य सुरू आहे. याच दुश्मनीच्या पार्श्वभूमीवर राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉलसमोर गुप्ता व शेख कुटुंबीयांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत आलेल्या अमित शेख याने राम नवल गुप्ताशी वाद घातला आणि त्यानंतर दोघांनी आपापली मुले बोलावली. यामुळे राम नवल गुप्ता, त्याचे पुत्र अमर, अरविंद व अमित गुप्ता आणि हमीद शेख, त्याचे पुत्र अरमान व हसन यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. यात राम नवल गुप्ता व अरविंद गुप्ता यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अमर व अमित गुप्ता हे गंभीर जखमी झाले आहेत.

दुसरीकडे, हमीद शेख याचा देखील मृत्यू झाला असून त्याचे पुत्र अरमान व हसन हे गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, दोन्ही कुटुंबांवर परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी जखमी असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. एमएचबी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon