१२ भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याप्रकरणी सोसायटीतील तरुणाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – भटक्या कुत्र्यांवरील मारहाणीच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा सोसायटींमध्ये खाद्यपदार्थ देण्यावरुनही वाद झाल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातून १२ भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये १३ एप्रिल रोजी भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार मारल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी सोसायटीमधील सदस्य अलौकिक राजू कोटे याला ताब्यात घेतलं आहे. अलौकिक नावाच्या तरुणाने भटक्या कुत्र्यांची निर्दयीपणे हत्या केली.
या सोसायटीमधील १२ भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होत्या. यात ८ कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी अलौकिक पहाटेच्या सुमारास आपली चारचाकी सोसायटीच्या आवारामध्ये ४ ते ५ वेळा फिरवताना दिसून आला. त्याच्या मागे काही भटकी कुत्रे धावतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. अलौकिकच्या मोबाइलमध्ये सुद्धा विषयप्रयोग करण्यासंबंधित गुगलवर सर्च केल्याचं दिसून आलं आहे. मुक्या प्राण्यावर हा विषप्रयोग का करण्यात आला याबाबत माहिती समोर आलेली नाही. तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.