शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत; पाय घसरून ओढ्याच्या पाण्यात बुडाले
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली आहे. या घटनेने गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. साहिल दत्तात्रय चौधरी (१९) आणि किरण नारायण चौधरी (१४) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोगलगाव येथे वस्तीवर राहणारे दत्तात्रय व नारायण चौधरी हे दोघे भाऊ शेती व्यवसाय करतात. दत्तात्रय हे खासगी वायरमन म्हणूनही काम करतात. बुधवारी दुपारी शेतात खत टाकण्यासाठी साहिल दत्तात्रय चौधरी (१९) व किरण नारायण चौधरी (१४) हे चुलतभाऊ कुटुंबियांसोबत गेले होते. खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल व किरण हे हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेले.
सध्या निळवंडे धरणातून तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. डाक तलावात पाणी सोडण्यासाठी ओढ्याचे खोलीकरण करण्यात आलेले आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, किरण हा नुकताच आठवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता तर साहिल लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौधरी कुटुंबाला धीर देण्यासाठी अनेक नातेवाईक पोहचले. प्रवरा रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी गोगलगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.