मुंबईत परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याने २३ वर्षीय तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. पवई येथे ड्रोन दिसल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे आली होती. त्यानंतर शोध घेतला असता आरोपी तरुणाने ड्रोन उडवल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने परवानगी शिवाय ड्रोन उडवण्याला बंदी आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके व रॉकेट उडवण्यावरही बंदी घातली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ मे रोजी मध्यरात्री १२:३० वाजता कंट्रोल रूमला दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवईमधील साकी विहार रोडवरील सोलारिस परिसरात एक ड्रोन कोसळले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीकडून माहिती घेतली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की हा ड्रोन अंकित ठाकूर या २३ वर्षीय तरुणाने उडवला होता. तो मूळचा हैदराबादचा असून सध्या पवईत राहतो. पवई पोलिसांनी ड्रोनची पाहणी केली. काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी ड्रोनसह तरुणाला ताब्यात घेतले व चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत अंकितने सांगितले की, त्याने हा ड्रोन एक वर्षापूर्वी खरेदी केला होता, पण तो काही काळ नादुरुस्त होता. अलीकडेच त्याने ड्रोन दुरुस्त करून घेतला आणि चाचणी म्हणून उडवला. ड्रोन उडवण्यासाठी त्याने कोणत्याही अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतलेली नव्हती, असेही त्याने कबुल केले. त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.