बनावट दस्त फसवणूक प्रकरणी दीपक मानकर यांच्यासह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह तिघांविरुद्ध बनावट दस्त करुन फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी बनावट दस्त केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शंतनू कुकडे याच्यासह आठ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आठ जणांना अटक झालेली आहे. दरम्यान, कुकडे याचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या खात्यातून दीपक मानकर व त्यांच्या मुलाच्या बँक खात्यात पावणे दोन कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. तसेच कुकडे याच्या खात्यात देखील कोट्यवधी रुपये असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला. संबंधित रक्कम ४० ते ५० जणांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती.
दरम्यान, जैन, मानकर, कुकडे यांनी आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी बनावट दस्त तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. बनावट दस्त सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी जैन, कुकडे व मानकर या तिघांविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. परिमंडळ – १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.