`दररोज पैसे कमवा’ च्या लोभापाई २४ लाखांना चुना; उल्हासनगरातील प्रकार, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

`दररोज पैसे कमवा’ च्या लोभापाई २४ लाखांना चुना; उल्हासनगरातील प्रकार, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर – राज्यात ठिकठिकाणी फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस प्रशासन सातत्याने आवाहन करून देखील नागरिक भूलथापांना व आमिषाला बळी पडतात. सोशल मीडियावर घरबसल्या मोबाईलवर काम करून पैसे कमवा, अशा अनेक जाहिराती दररोज वाचायला मिळतात. काही जण घरबसल्या काम मिळत असल्याने या जाहिरातींना भुलतात. त्यातून सुरुवातीला काही पैसे मिळतात सुद्धा. मात्र पुढे जाऊन यात फसवणूक झाल्याचे समोर येते. असाच काहीसा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. एका ५३ वर्षीय व्यक्तीला एका भामट्याने तब्बल २४ लाख ६१ हजार ८३६ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नुकताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यात अनेक जण दररोज फसत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित, श्रीमंत अशा व्यक्तींचा यात अधिक भरणा आहे. काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर विविध टास्क अर्थात कामे करुन पैसे कमवून देतो असे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली जात होती. ऑनलाइन माध्यमावर अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईट्सवर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा यासाठी पैसे मिळतील असे आश्वासन दिले जात होते. त्यासाठी काही पैसे लोकांना सुरुवातीला दिले जात होते. मात्र काही काळानंतर कामाचे पैसे मिळवण्यासाठी काही अनामत रक्कम भरावी लागेल. काही एक प्रकारचे पैसे भरावे लागतील असे सांगून समोरच्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या खात्यात पैसे मागितले जात होते. शेवटी पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे दिसून येत होते. त्यानंतर फसवणूक झालेले पोलिसात धाव घेत होते.

सध्या सोशल मीडियावर कोणतेतरी ऑनलाईन काम करून घरबसल्या पैसे कमवा असे आमिष आता दाखवले जात आहे. अशाच एका अमिषाला बळी पडून उल्हासनगरात एका व्यक्तीची २४ लाखांची फसवणूक झाली आहे. त्यांना ९०३१९२०५१७ वरुन दररोजचे उत्पन्न हवे असल्यास विल्यम सोनोमा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनी असून त्यावर नोंद करून दिवसाचे रुपये १ ते दीड हजार कमावता येतील, असे खोटे आमिष दाखवले गेले. या कंपनीच्या बनावट वेबसाईटवर ऑक्शनच्या नावाखाली वेळोवेळी २४ लाख ६१ हजार ८३६ रुपये घेवुन तक्रारदाराची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon