प्रेम, फसवणूक अन् ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली आयकर अधिकाऱ्याने साखरपुड्याच्या दिवशीच संपवले जीवन
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशकात सध्या खूप मोठया प्रमाणावर गुन्हेगारी वाढत चालली आहे. फसवणूकीच्या घटना देखील वारंवार घडत असतात, अशीच एक घटना घडली आहे. नाशकात प्रेम प्रकरणात फसवणूक झाल्याचा वेगळाच प्रकार समोर आला. नाशिक शहरातील आयकर कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये लग्न ठरले होते. त्यानंतर साखरपुडाही वाराणसीत झाला. परंतु त्या दिवशी आणि त्यानंतर जे झाले, तो प्रकार धक्कादायक होता. त्या प्रकारानंतर आयकर अधिकारी प्रचंड तणावात आला. त्या तणावातून त्याने नाशिकमध्ये आपले जीवन संपवले.
प्रकरण काय आहे ?
नाशिकमधील आयकर कार्यालयात हरेकृष्ण पांडे हे अधिकारी कार्यरत आहे. त्यांच्या लग्नासाठी वधू संशोधन मोहीम सुरु होती. उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील मुलगी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांचे लग्न ठरले. सर्व काही सुरळीत सुरु होते. भावी वैवाहिक जीवनाची स्वप्न ते पाहत होते. त्यांचा साखरपुडाही निश्चित करण्यात आला. वाराणसीमध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु साखरपुड्यातच त्यांची वधू होणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकराला मिठी मारली. त्यामुळे त्या मुलीचे प्रेमप्रकरण उघड झाले. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर ती वधू हरेकृष्ण पांडे यांना धमकी देऊ लागली. “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”, अशी धमकी त्या वधूकडून आयकर विभागातील अधिकाऱ्याला दिली गेली. त्यामुळे पांडे प्रचंड तणावात आले.
हरेकृष्ण पांडे होणाऱ्या वधूकडून छळामुळे प्रचंड मानसिक तणावात आले. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केली. नाशिकमधील उत्तमनगर परिसरात गळफास घेत टोकाचे पाऊल त्यांनी उचलले. बायको होणाऱ्या युवतीकडून सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून लवकरच याबाबत सत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.