लग्नास नकार आणि मानसिक त्रासाला कंटाळून रबाळे परिसरात २४ वर्षीय तरुणीची हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या; प्रियकराला अटक

Spread the love

लग्नास नकार आणि मानसिक त्रासाला कंटाळून रबाळे परिसरात २४ वर्षीय तरुणीची हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या; प्रियकराला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या वादातून २४ वर्षीय तरुणीने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या देवेंद्र पुरी (२४) ही भांडुप येथील रहिवासी होती. तिने नवी मुंबईतील रबाळे परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी दिव्याचे वडील देवेंद्र लक्ष्मीनारायण पुरी (४७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, दिव्या आणि विवेक राजेश सिंग (२७) यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्ये वारंवार भेटीगाठी होत होत्या. दिव्याने विवेककडे लग्नासाठी आग्रह धरला होता. मात्र विवेक हा लग्नाबाबत वारंवार टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जाते.

तसेच विवेककडून दिव्याला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासाला आणि लग्नाबाबतच्या वादाला कंटाळून दिव्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत रबाळे परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान दिव्याच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, आरोपी विवेक राजेश सिंग (२७) असा आहे. तो नवी मुंबईतील वाशी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला १४ मार्च २०२६ रोजी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon