मानवी तस्करी प्रकरण: हुबळी, पश्चिम बंगाल येथून महिला आरोपीला अटक; दोन अल्पवयीन मुलांची सुटका
मुंबई – येथील वडाळा टी.टी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मानवी तस्करीच्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पश्चिम बंगालमधील हुबळी येथून महिला आरोपी रेश्मा संतोषकुमार बॅनर्जी हिला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ५ ऑगस्ट २०२४ रोजी सुरू झालेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झाली, जेव्हा अमर धिरेन सरदार यांनी त्यांच्या जावयाने आपला दोन वर्षांचा नातू विकल्याची तक्रार वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तपासात अनिल पुर्वय्या याने आपल्या मुलाला आरमा शेख, शरीफ शेख आणि आशा पवार यांच्या मदतीने १.६० लाख रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी मुंबई व हैदराबाद येथून संबंधित आरोपींना अटक केली. तपास पुढे चालू ठेवताना आरोपीने मुलाची विक्री भुवनेश्वर रेल्वे स्टेशन येथे रश्मी नावाच्या महिलेला विक्री केल्याचे कबूल केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रश्मी बॅनर्जी हाय टेक डेंटल हॉस्पिटल, भुवनेश्वर येथे कार्यरत असल्याचे आढळले. मात्र, ती तेथून निघून गेली होती. अधिक तपासातून तिचा पत्ता हुबळी, कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक पोलीसांच्या मदतीने तिच्यावर छापा टाकण्यात आला. त्या वेळी ती मुलगा आणि एका ३ वर्षाच्या अनोळखी मुलीसह आढळली. तिला तात्काळ अटक करून ट्रांझिट रिमांडवर मुंबई आणण्यात आले. यातील मुलगा तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आला असून अनोळखी मुलगी बालगृहात ठेवण्यात आली आहे.
या मुलाच्या शरीरावर जखमांचे निशाण आढळल्याने त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींनी मुलांवर मारहाण केल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणात आता जे. जे. अॅक्टच्या कलम ७५ नुसार अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वडाळा टी.टी. पोलिसांचे तपास कौशल्य आणि देशभरातील पोलिस यंत्रणांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई विवेक फणसळकर (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), देवेन भारती (विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), सत्यनारायण चौधरी (सह पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था), अनिल पारसकर (अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई), श्रीमती रागसुधा आर. (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, माटुंगा, मुंबई), मा. शैलेंद्र धिवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, सायन विभाग, मुंबई), मा. रमेश जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडाळा टी.टी. पोलीस ठाणे, मुंबई) आणि पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले (गुन्हे विभाग) यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कामगिरी पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार अंग्रक, पोलीस शिपाई. शिंदे, आणि म.पो.शि.मुरकुटे यांनी चिकाटी, संयम आणि उत्कृष्ट समन्वयाने पूर्ण केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे कठीण प्रकरण यशस्वीरित्या हाताळले गेले.