कल्याण हादरलं! खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, मुलांना बेदम मारहाण.पाचही आरोपींना अटक.

Spread the love

कल्याण हादरलं! खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, मुलांना बेदम मारहाण.पाचही आरोपींना अटक.

योगेश पांडे – वार्ताहर 

कल्याण – कल्याण-टिटवाळा जवळच्या खडवली येथे एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. जिल्हा महिला बाल कल्याण समितीने केलेल्या पाहणीत खडवली येथील पसायदान नावाच्या खाजगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. यासोबतच वसतिगृहातील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच वसतिगृहाच्या संचालकासह पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाचा कर्मचारी प्रकाश गुप्ता याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद कृत्यामुळे परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसतिगृहाचे संचालक बबन शिंदे, त्यांची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडित आणि कर्मचारी प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

पसायदान या वसतिगृहात बेघर, निराधार आणि गरीब गरजू मुलांच्या राहण्याची सोय आहे. तसेच जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. सध्या या ठिकाणी १२ ते १५ मुले राहत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी या वसतिगृहात मुलांना मारहाण होत असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे आली होती. या तक्रारीची दखल घेत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वसतिगृहाची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान समितीच्या सदस्यांनी मुलांना विचारले असता मारहाणीची बाब समोर आली. अधिक चौकशीत कर्मचारी प्रकाश गुप्ता याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर तातडीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे कल्याण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निराधार मुलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon