सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का, ईडीकडून नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात ७०० कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु.

Spread the love

सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का, ईडीकडून नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात ७०० कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु.

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय. ईडीकडून नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात ७०० कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी निगडित आहे. यामध्ये मुंबई, लखनौ आणि दिल्लीतील काही संपत्तीचा समावेश आहे. याशिवाय दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावरील स्थावर मालमत्तेचा देखील यामध्ये समावेश आहे. याबाबतची माहिती रविवारी ईडीने दिलीये.

ईडीने केलेल्या चौकशीत आर्थिक घोटाळ्याचा खुलासा करण्यात आला होता. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम (8) आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. या मालमत्ता असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या मालकीच्या आहेत, ज्या यंग इंडियन लिमिटेड (वायआयएल) ने विकत घेतल्या आहेत. ईडीचे म्हणणे आहे की सोनिया आणि राहुल गांधी यांचा YIL मध्ये मोठा वाटा आहे.

ईडीने ११ एप्रिल रोजी मुंबई, दिल्ली आणि लखनौ या तिन्ही शहरांच्या मालमत्ता नोंदणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. तपासात असे दिसून आले आहे की, एजेएलच्या मालमत्ता सुमारे ९८८ कोटी रुपयांच्या आहेत, ज्या बेकायदेशीर मार्गांनी मिळवण्यात आल्या होत्या.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र पूर्वी एजेएल द्वारे प्रकाशित केले जात होते. ही कंपनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाली होती आणि दिल्ली, मुंबई आणि लखनौ सारख्या शहरांमध्ये तिच्या अनेक मालमत्ता होत्या. ईडीचा आरोप आहे की YIL ने AJL ला फक्त ५० लाख रुपयांना खरेदी केले, तर त्यांची मालमत्ता २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि फसवणूकीचे आरोप झाले आहेत.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये दिल्ली न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. सोनिया आणि राहुल गांधी यांनी एजेएलच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने वायआयएलला हस्तांतरित केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. यानंतर २०२१ मध्ये ईडीने तपास सुरू केला. तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले, जसे की YIL ला बनावट देणग्यांद्वारे १८ कोटी रुपये मिळाले, ३८ कोटी रुपये आगाऊ भाडे म्हणून घेतले गेले आणि जाहिरातींद्वारे २९ कोटी रुपये उभारले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon