प्रवाशांशी उध्दट, बेशिस्त वर्तन करणाऱ्या डोंबिवलीतील ३५ रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ कडून धडक कारवाई

Spread the love

प्रवाशांशी उध्दट, बेशिस्त वर्तन करणाऱ्या डोंबिवलीतील ३५ रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ कडून धडक कारवाई

महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित/ वार्ताहर

डोंबिवली – कल्याण डोंबिवली परिसरात नेहमीच रिक्षाचालकांकडून प्रवाशांना भाडे नाकरणे, प्रवाशांशी उध्दट वर्तन करणे, गणवेश न घालता रिक्षा चालविणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण येथील कार्यालयात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन बुधवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने डोंबिवलीत दाखल होऊन ३५ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, पाटकर रस्ता भागात अडवून रिक्षांची तपासणी सुरू करताच, काही रिक्षा चालकांनी संघटित होऊन या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई नियमित तपासणीचा भाग असल्याचे सांगून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षांची तपासणी केली. या तपासणीच्या वेळी अनेक रिक्षा चालक गणवेशात नसल्याचे आढळून आले. काही रिक्षा चालकांकडे रिक्षेची कागदपत्रे नव्हती. अनेक रिक्षा परवान्याची मुदत संपुनही प्रवासी वाहतूक करत होत्या. काही रिक्षांची वाहन प्रदुषण नियंत्रणाची मुदत संपुनही त्याचे नुतनीकरण करण्यात आले नव्हते. तपासणीमध्ये असे रिक्षा चालक कारवाईच्या फेऱ्यात येताच अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना घटनास्थळीच ई चालनच्या माध्यमातून दंड ठोठावला.

सदर कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक बालाजी बोदरवाड, मोटार वाहन निरीक्षक विजय नरवाडे यांच्या पथकाने केली. रिक्षा चालकांनी हुल्लडबाजी करून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी त्यास जुमानले नाही. डोंबिवली पूर्व, पश्चिमत भागात बहुतांशी रिक्षा चालक गणवेश न घालता, रेल्वे स्थानक भागातील वाहनतळ सोडून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर, रेल्वेच्या प्रवेशव्दारावर रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतूक करतात. मनासारखे भाडे मिळत नसेल तर प्रवासी भाडे नाकारतात अशा तक्रारी आरटीओ अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. आरटीओ अधिकारी डोंबिवलीत अचानक दाखल होताच, बेशिस्त रिक्षा चालक रेल्वे स्थानक भागातून पळून गेले.

कोट नियमित कारवाई होणार – उपप्रादेशिक अधिकारी

आरटीओ अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला अशाप्रकारची कारवाई करावी, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत. कल्याण पश्चिमेत लालचौकीकडे जाणाऱ्या प्रवाशांना भाडे नाकारण्याचे प्रकार अधिक आहेत. या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

डोंबिवलीतील मुख्य वर्दळीचे चौक, रस्ते, सीमेंट काँक्रीटची कामे चाललेल्या रस्ते भागात सतत वाहतूक कोंडी होते. याठिकाणी रिक्षा चालकांनाही अडकून पडावे लागते. अशा कोंडीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस, सेवक तैनात करण्याची रिक्षा संघटनांची वाहतूक विभागाकडे मागणी आहे.

डोंबिवलीतील रिक्षा चालकांविषयी अनेक तक्रारी आरटीओ कार्यालयात प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे बुधवारी डोंबिवलीत आरटीओच्या पथकाने अचानक कारवाई करून ३५ रिक्षा चालकांना दंड ठोठावला. ही कारवाई यापुढे कल्याण, डोंबिवलीत नियमित केली जाणार आहे

—आशुतोष बारकुल,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon