आयकर विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी ३१४ कोटींची नोटीस; मजूराची तब्बेत खालावली

Spread the love

आयकर विभागाचा अजब कारभार? मजूराला पाठवी ३१४ कोटींची नोटीस; मजूराची तब्बेत खालावली

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपूर – आयकर विभागाची एक नोटीस सध्या नागपूरात चर्चेचा विषय ठरली आहे. आयकर विभागानं एका मजूराला तब्बल ३१४ कोटींची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळता संबधीत मजूराची तब्बेत खालावली. हा धक्का त्याला सहन झाला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आयकर विभागाने ही नोटीस का पाठवली याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. त्यात आता आयकर विभागाने ही आपली भूमीका स्पष्ट केली आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. चंद्रशेखर कोहाड हे नागपूरात मजूरीचं काम करतात. हातावर पोट भरणारे, मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे चंद्रशेखर कोहाड यांना आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटींची नोटीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोहाड हे मूळचे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कोहाड हे काही दिवसांपासून नागपूरमध्ये मजुरीचे काम करत आहेत. त्यांची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती आहे. असं असतानाही इतक्या मोठ्या रकमेची आयकर नोटीस मिळाल्यामुळे कोहाड यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहाड यांनी २०१३-१४ या आर्थिक वर्षात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार केला आहे. असा दावा आयकर विभागाचा आहे. ३१४ कोटी रुपये हे फक्त थकित आयकराचे असल्याचे ही या सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती चंद्रशेखर कोहाड यांनीच केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आयकर विभागाकडून ३१४ कोटी ७९ लाख ८७ हजार ८३ रुपयांची नोटीस प्राप्त झाली होती. नागपूरच्या आयकर विभागाने बैतूलमधील मुलताई नगरपालिकेकडे कोहाड यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागवली होती. मात्र कोहाड यांच्या नावावर कोणतीही जमीन नोंदणीकृत नसून ती आमलाच्या देवठाण येथील रहिवासी राधेलाल किराड यांचा मुलगा मनोहर हरकचंद यांच्या नावावर आहे. कोहाड यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तशी माहिती त्यांनी आयकर विभागाला दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान चंद्रशेखर कोहाड यांनी सांगितले की, त्यांची पत्नी गंभीर आजारी असून नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात आहे. ते स्वतः हृदयरोगी असून आयकर विभागाच्या या अनपेक्षित नोटीसमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. तर चंद्रशेखर कोहाड यांनी हजारो कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. याचा आमच्याकडे पुरावा असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. शिवाय कोहाड यांनी देखील चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या आहेत असा दावा ही आयकर विभागाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon