मुंबईत लाडक्या बहिणींची फसवणूक, मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती. निवडणूकीपूर्वी महायुती सरकारला याचा खूप फायदा होऊन लाडक्या बहिणीनी सरकार येण्यास हातभार लावला, मात्र निवडणूकीनंतर लाडक्या बहिणीवर निर्बंध येऊन लाडकी बहीण योजना अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी काही महाभाग लाडक्या बहिणीची फसवणूक करीत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाने ६५ महिलांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द परिसरात समोर आला आहे. महिलांकडून घेतलेल्या कागदपत्रांवरून संबंधित आरोपींनी एका खाजगी वित्त पुरवठा कंपनीत आयफोनसाठी अर्ज करून सुमारे २० लाखांच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुमीत गायकवाड, राजू बोराडे, रोशन, दानिश आणि शाहरूख अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका वित्तपुरवठा कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीत ६५ महिलांनी आयफोनसाठी अर्ज केला होता. अर्जानंतर त्यांना सुमारे २० लाखांचे कर्ज मंजूर झाले होते. मात्र कर्ज दिल्यानंतर त्यांनी कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते. या महिलांची चौकशी करण्यात आली असता या कर्जाशी या महिलांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी दिलेली कागदपत्रे या टोळीने वापरल्याचेही उघड झाले. सुमीत आणि राजू यांनी या महिलांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेताना कागदपत्रे घेतली होती. त्यावेळी त्यांना अंधेरी आणि कुर्ला येथील एका मोबाईल शॉपमध्ये आणले आणि आयफोन घेऊन त्यांचे फोटो काढण्यात आले होते. एक महिन्याचा लाडक्या बहिणीचा अडीच हजारांचा हप्ता रोखण्यात आला व त्यांना पुढील महिन्यात त्यांच्या बँक खात्यात पुढील हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता बँक खात्यात आलाच नाही. सुमीत आणि राजूने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने या महिलांच्या कागदपत्रांवरून त्यांच्याच नावाने आयफोनसाठी सुमारे २० लाखांचे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न करता कंपनीची फसवणूक करून ते पळून गेले. कर्जाचे हप्ते न आल्याने कंपनीने शहानिशा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.