थेट नेपाळ येथून प्रेयसीला पालघर जिल्ह्यात आणून तिची हत्या
नदीच्या पुलाखाली बांधून फेकलं; गोणीवरच्या मार्कने बॉडीचं गूढ उकललं, मोखाडा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – प्रेम संबंधातून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नासाठी प्रेयसी तगादा लावत असल्याने प्रियकराने थेट नेपाळ येथून प्रेयसीला पालघर जिल्ह्यात आणून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह वाघनदी पुलाखाली गोणीत बांधून फेकून दिला. या प्रकरणाचा तपास करत मोखाडा पोलिसांनी प्रियकर राजकुमार वरही आणि त्याच्या दोन साथीदार आरोपींना अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वाघ नदी पुलाखाली काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा गोणीत बांधलेला मृतदेह स्थानिकांना आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा मोखाडा पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. काजोल गुप्ता आणि राजकुमार वरही (२४) हे नेपाळ येथील मूळचे रहिवासी असून त्यांचे प्रेमसंबंध होते. काजोल ही राजकुमार याच्याजवळ नेहमी लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. यामुळे तिचा प्रियकर राजकुमार याने तिची हत्या करून काटा काढण्याचे ठरवले. राजकुमार याने त्याच्या वडिलांचे सिलवासा येथे राहणारे मित्र सुरेश सिंग (५०) आणि वाहनचालक बालाजी वाघमारे (३४) या दोघांच्या मदतीने काजोलची हत्या करण्याचे षडयंत्र रचले.
प्रियकर राजकुमार फिरण्याच्या नावाने प्रियसी काजोल गुप्ता हिला नेपाळ येथून सिलवासा येथे घेऊन आला. त्यानंतर बालाजी वाघमारे याच्या कारमधून सुरेश सिंग यांच्यासह काजोलला पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील महालक्ष्मी मंदिरात आणि नाशिक येथील त्रंबकेश्वर परिसरात फिरवले. नाशिक येथून परत येत असताना मोखाडा येथील जंगलात काजोलचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या करून तिचा मृतदेह एका गोणीत भरला. त्यानंतर गोणीत भरलेला मृतदेह नाशिक – जव्हार मार्गावरील मोखाडा तालुक्यातील घाटकरपाडा गावाच्या हद्दीतील वाघ नदीच्या पुलाखाली फेकून दिला.वाघ नदी पुलाखाली आढळलेल्या गोणीतील अज्ञात महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा छडा पोलिसांनी गोणीवर आढळलेल्या एसएम २८ या मार्कच्या साहाय्याने लावला आहे. राजकुमार वरही याने दोन साथीदारांच्या मदतीने प्रेम संबंधातून काजोलची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह गोणीत बांधून फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.