उच्चशिक्षित व्यक्तीला व्यसन जडलं, नशेचा खर्च भागवण्यासाठी युट्युब पाहून शिताफीने चोरी; अखेर चोरटा जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – यूट्यूबवरुन रिक्षाचे स्वीच कसे तोडायचे याची माहिती घेऊन रिक्षासह दुचाकी चोरणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीस नौपाडा पोलिसांनी अटक केली. पत्नी सोडून गेल्याने हा आरोपी नशेच्या आहारी गेला. आणि नशा करण्यासाठी आवश्यक खर्च भागवण्याकरीता तो वाहन चोरीकडे वळल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून चार रिक्षा, एक दुचाकी आणि रोकड जप्त करण्यात आली असून आरोपीच्या चौकशीमध्ये सात चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. नौपाडा परिसरातून एक रिक्षा चोरीला गेल्याबाबत नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यांनी सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषणानंतर शबाब हुसेन नायब हुसेन रिझवी सैयद – ४१ याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची बाब स्पष्ट झाली.
मुंब्र्यात राहणारा शबाब पुन्हा नौपाड्यामध्ये चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर भांगे यांच्या पथकाने पाचपाखाडी परिसरात सापळा लावून त्याला अटक केली. चौकशीमध्ये आरोपीने ठाणे शहरात वाहन चोरीसह अन्य चोरीचे गुन्हे केल्याची बाब उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नौपाडा पोलिस ठाण्यातील पाच, राबोडी आणि वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक-एक अशा एकूण सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी वाकोला पोलीस ठाण्यासह अन्य दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी शबाब हुसेन हा उच्चशिक्षित असून त्याचे शिक्षण एम.कॉम पर्यंत झाले आहे. पूर्वी त्याने आयटी कंपनीमध्ये डाटा इन्ट्री ऑपरेटरचे तसेच दुबईत विमातळावर चालकाचे काम केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. काही वर्षांपूर्वी आरोपीला त्याची पत्नी सोडून गेली. त्यामुळे नशेच्या आहारी गेलेला हा आरोपी वाहने चोरी करु लागला. रिक्षाचे स्वीच कसे असते. आणि ते कसे तोडायचे याची माहिती त्याने यूट्य़ूबवर व्हिडिओ पाहून घेतली. नंतर त्याने रिक्षा, दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. रिक्षा चोरल्यानंतर रिक्षातील पेट्रोल संपेपर्यंत रिक्षातून प्रवाशांची वाहतूक करत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशातून तो नशा करायचा. पेट्रोल संपल्यानंतर आरोपी रिक्षा सोडून देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी नौपाडा पोलिसांनीच आरोपीला अटक केली होती.