मुंबईमध्ये ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या गावात स्वतः ची ड्रग्ज फॅक्ट्री; एनसीबी कडून १७ कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करून कोट्यवधी रुपयांचं ड्रग्स जप्त केलं आहे. चाकूर तालुक्यातील रोहिना गावात मुंबई आणि पुण्यातील अंमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी लातूर जिल्ह्यात तळ ठोकून होते. या तपासासाठी पथकाने त्यांच्यासोबत पाच आरोपीही आणले होते. ड्रग्स प्रकरणामध्ये मीरा-भाईंदरमधील पोलीस कर्मचारी असलेला प्रमोद संजय केंद्रे याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. प्रमोद केंद्रे हा मूळचा चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवासी आहे, त्याच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये ३ एप्रिल २०२५ पासून ड्रग्स बनवले जात असल्याचं उघड झालं आहे. या ठिकाणी छापा टाकून एनसीबीने १७ कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त केले आहेत.
लातूर ड्रग्स प्रकरणामध्ये प्रमोद संजय केंद्रे, मुंबईच्या डोंगरी भागातील रहिवासी आहाद अल्ताफ खान उर्फ आहाद शफिक मेमन तसंच इतर तिघांचा समावेश आहे. आरोपींना मुंबईत घेऊन जात असताना यातील आहाद शफीक मेमन याने पथकाच्या गाडीचा अपघातही केला होता. दरम्यान ड्रग्सच्या लातूर जिल्ह्यातील कनेक्शनमुळे मोठी खळबळ उडाली असून यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लातूर ड्रग्स कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विचारलं असता, त्यांनी संपूर्ण ड्रग्ज आणि आरोपींना मुंबईला नेलं असून त्यांच्यावर तिथेच कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.