लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, थोडक्यात बचावले
योगेश पांडे / वार्ताहर
लातूर – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामधून ते बचावले असले तरी या वृत्ताने लातूरमधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बाबासाहेब मनोहरे यांच्यावर लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवार पासून अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकारण्यांनी रुग्णालयात जाऊन मनोहरे यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. बाबासाहेब मनोहरे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे सध्या लातूरमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाळासाहेब मनोहरे यांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शासकीय बंगल्यातील त्यांच्या खोलीत डोक्यात गोळी झाडून घेतली होती. गोळीचा आवाज ऐकून त्यांच्या घरातील लोक खोलीत धावत गेले. तेव्हा बाळासाहेब मनोहरे जखमी अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी बाळासाहेब मनोहरे यांच्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली.रविवारी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्यात करण्यात आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी गरज पडल्यास पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. यावेळी महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही रुग्णालयाबाहेर उभे होते. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याबाबतचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. बाबासाहेब मनोहरे हे अडीच वर्षापासून लातूर येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी धाराशिव, नांदेड याठिकाणी काम केले आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली होती, ती उजव्या बाजूने आरपार निघाली आहे. या गोळीने बाबासाहेब मनोहरे यांची कवटी फोडली आणि गोळी डोक्यातून बाहेर पडली. बाबासाहेब यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली आहे. तुटलेल्या कवटीचे काही तुकडे बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूत पसरले आहेत.