पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला माणुसकीचा विसर; गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले १० लाख, महिलेचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर येत आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे दहा लाखांची मागणी केली होती. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यावर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेस त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झाला का? असा सवालही उपस्थित केला जातोय. पुण्यातील नामांकित रुग्णालय म्हणून हे रुग्णालय महाराष्ट्रात ओळखले जाते. कोणत्याही दूर्धर आजारावर अधूनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानासोबत निष्णात डॉक्टरांसाठी म्हणून या रुग्णालयाची ख्याती आहे. मात्र, आता रुग्णांपुढे रुग्णालयाला पैसा प्यारा झाला का? असा सवाल केला जातोय.
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.