शिवरायांचा अपमान करणारा आणि इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या, तेलंगणामधून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवरायांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक झाल्याची माहिती आहे. गृहविभागातील सूत्रांनी याची माहिती दिली आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता.
प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतलं. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे. प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन उच्च न्यायालय फेटाळणार असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे त्याला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय कोणताही पर्यात नव्हता. त्याचमुळे आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
प्रशांत कोरटकरने आधी कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण कोल्हापुरात जी चूक केली होती तीच चूक कोरटकरने उच्च न्यायालयात केली. उच्च न्यायालयातही कोरटकरने अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. पण एका न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वरचे न्यायालयही तो जामीन स्वीकारत नाही. त्याचमुळे कोरटकरसमोर कोणताही पर्याय नसल्याची माहिती आहे. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे. २५ फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरटकरनं २७ फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. २८ फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं त्याला अटकपूर्व जमीन मंजूर केला. कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जामीन मंजूर झाला. कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. १८ मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला.