शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेकडून प्रचंड मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने प्रचंड मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राणी कपोते असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर मोहन उगले असं माजी नगरसेवकाचं नाव आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरुन दोघांमध्ये वाद झाला. यावेळी महिलेने माजी नगरसेवकाला प्रचंड मारहाण केली. मारहाण करणारी महिला ही शिवसेनेचीच महिला कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पक्षश्रेष्ठी काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम काल सायंकाळी होता. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता. त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्याठिकाणी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोते पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या कामाचा पाठपुरावा मी केला आहे. त्यानंतर त्याठिकाणी जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला होता. हा राग राणी कपोते यांनी धरला.
सोमवारी दुपारी अहिल्याबाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले आमनेसामने आले. राणी कपोते यांनी तू मला शिव्या का देतो? माझ्यासोबत गैरवर्तन काय करतो? असं म्हणत उगले यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात उगले यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राणी कपोते यांनी उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. हा वाद इतका टोकाला पोहोचेल असं कुणाला वाटलं नव्हतं. दरम्यान महाराण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर मोहन उगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पुरुषांच्या अंगावर जाणे, पुरुषांना धक्काबुक्की करणे असा प्रकार झाला होता. त्यामुळे आम्ही बाझारपेठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. तक्रार केल्यानंतर सदर घटनेचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही. ती शिवसेनेची पदाधिकारी नाही. मी प्रतिकार केला असता तर मीडियात किती बवाल झाला असता की, एक पुरुषाने महिलेवर हात टाकला. माझी पक्षाकडे मागणी आहे, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया मोहन उगले यांनी दिली आहे.