तडीपार गुंडासह चौघांना बेड्या, ४ पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – तडीपार गुंडाचे वास्तव्य शहरातच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, नुकतेच याबाबत दैनिकाने वृत्त दिले होते. त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, नंतर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणार्या सराईत गुन्हेगारांसह चौघांना एकाच वेळी अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने त्यांच्याकडून ४ पिस्तूल व ८ जिवंत काडतूसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. वाघोली येथे एका मित्राच्या लग्नासाठी ते एकत्र आले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गोपाळ संजय यादव (२४), अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (२३), इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (२४) आणि देवानंद शिवाजी चव्हाण (२३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक गौरव देव, सुनिल पवार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे यांच्यासह पथकाने केली आहे.
पटेल आणि पंदी यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. तर, यादव याच्यावर दरोडा, खूनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चारही आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. गोपाळ यादव हा वाघोलीतील राजेश्वरी नगरी भागात रहायला आहे. त्यांच्या एका मित्राचे लग्न असल्याने चौघेजण यादव याच्या घरी आले होते. यादरम्यान रेकॉर्डवरील आरोपी हे वाघोली भागात असून, दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार पिस्तूल व आठ काडतूसे आढळून आली. त्यानूसार पथकाने चौघांना अटक केली आहे.