ठाणे ग्रामीण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे; पत्रकार परिषदेत कोकण आयजी संजय दाराडे व एसपी डॉ. डी. एस. स्वामी यांची माहिती
ठाणे – ठाणे ग्रामीण क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ४,५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आयजी कोकण रेंज संजय दाराडे, एसपी डॉ. डी. एस. स्वामी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
पत्रकार परिषदेत आयजी संजय दाराडे यांनी सांगितले की, या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीने गुन्हेगारी नियंत्रणात राहणार असून तपास प्रक्रियेला वेग येणार आहे. हे कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी, प्रमुख रस्त्यांवर, संवेदनशील भागात आणि सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर सतत नजर ठेवता येईल. त्यांनी असेही सांगितले की, या उपक्रमामुळे नागरिकांची सुरक्षितता वाढेल आणि पोलिसांची देखरेख क्षमता अधिक बळकट होईल.
एसपी डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, हे कॅमेरे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यामध्ये उच्च गुणवत्तेची रेकॉर्डिंग आणि थेट मॉनिटरिंगची सुविधा उपलब्ध आहे. या कॅमेर्यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन सुधारले जाणार असून संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करणे शक्य होईल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा उपक्रम राज्य सरकारच्या “स्मार्ट आणि सुरक्षित शहर” योजनेंतर्गत राबवला जात आहे, ज्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक सशक्त केली जात आहे. त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, या उपक्रमात पोलिसांना सहकार्य करावे आणि कुठल्याही संशयास्पद हालचालींबाबत तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, हा उपक्रम ठाणे ग्रामीण क्षेत्र गुन्हे मुक्त आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.