गँगस्टर छोटा राजन याला मोठा दिलासा; इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी निर्दोष मुक्तता
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या २०११ च्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात बंद आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत विशेष न्यायधीश ए. एम. पाटील यांनी राजनची प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. १७ मे २०११ रोजी दक्षिण मुंबईत आरिफ अबुनाकर सय्यद नावाच्या व्यक्तीवर दोन आरोपींनी गोळीबार केला होता. आरिफ सय्यद हा दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा ड्रायव्हर होता. या प्रकरणात छोटा राजनवर खुनाचा आरोप करण्यात आला होता. जर त्याची इतर कोणत्याही प्रकरणात गरज नसेल तर त्याची तात्काळ मुक्तता करावी, असा निकाल कोर्टाने दिला. मात्र पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राजनला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
दक्षिण मुंबईत १७ मे २०११ रोजी दोन लोकांनी आरिफ अबुनाकर सैय्यद या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. सैय्यद हा फरार गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा लहान भाऊ इकबाल हसन शेख इब्राहिम सेख कासकर याचा चालक आणि अंगरक्षक होता. पोलिसांनुसार, ही हत्या छोटा राजन याच्या इशार्यावरून करण्यात आली होती. राजनवर भारतीय दंड संहिता आणि मकोका, शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत खून आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या प्रकरणात राजन हा तुरुंगातच राहणार आहे. राजनवर इतर ही अनेक गुन्ह्यात खटले दाखल आहेत. छोटा राजन याचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये त्याचे मोठे नाव होते. राजन याचा जन्म मुंबईतील चेंबूर येथील टिळकनगरात झाला होता. तो कधीकाळी दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा होता. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. २०१५ मध्ये त्याला इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्यात आले. तेव्हापासून तो तुरूंगात आहे.