नोकरी आणि शिक्षण प्रवेशाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर – नोकरी आणि शिक्षण प्रवेशाच्या आमिषाने नागरिकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसगाव येथील कोहिनूर पार्क परिसरात राहणाऱ्या महिलेसह इतर काही नागरिकांना मोठ्या रकमेचा गंडा घालण्यात आला. तक्रारदार कुसुम अशोक लाड यांना वडिलोपार्जित जमिनीवरील सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी मदतीची गरज होती. राजू आसने नावाच्या व्यक्तीने त्यांना पंकज अंबादास म्हस्के याची माहिती दिली. म्हस्के मंत्रालयात ओळखी असल्याचे सांगत हे काम करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. सुरुवातीला तक्रारदारांनी २५ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात दिले. मात्र, काम झाले का, असे विचारताच वेळोवेळी टाळाटाळ सुरू झाली. त्यानंतर जबाबदारी टाळत म्हस्के आणि त्याच्या कुटुंबीयांनी पैसे परत देण्यास नकार देत धमकी दिल्याचा आरोप आहे.
याच टोळीने इतर नागरिकांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बबिता उमेश सिंग यांना ४७ हजार ५०० रुपये घेऊन मुख्यमंत्री निधीतून एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच, कृष्णा गजानन बरवे यांचे ६० हजार रुपये आणि करण दत्तात्रय उडदंगे यांचे ४९ हजार रुपये घेऊन विद्युत वितरण कंपनीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी फौजदार काळे पुढील तपास करत असून पोलिस नागरिकांना अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करत आहेत.