फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

Spread the love

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

मुंबई – फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर चुनाभट्टी पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. शेअर बाजार ट्रेडिंगपेक्षा फॉरेक्स ट्रेडिंग अधिक नफेशीर असल्याचे सांगून नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त करणाऱ्या या रॅकेटविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गुन्हेगारांकडून नागरिकांना एक विशिष्ट फॉरेक्स ट्रेडिंग अँप डाउनलोड करण्यास सांगितले जात होते. त्यानंतर त्यांचे बँक खाते संलग्न करून यूएसडीटी खरेदी करून ट्रेडिंगसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त केले जात होते. सुरुवातीला नफ्याचे आकर्षण दाखवले जात होते, मात्र पैसे विड्रॉ करण्याच्या वेळेस ग्राहकांचे आयडी-पासवर्ड ब्लॉक होत होते. त्यानंतर विविध कारणांनी अधिक पैसे भरण्यास भाग पाडले जात होते. असे करत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत होती.

चुनाभट्टी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जोगानी इंडस्ट्री, चुनाभट्टी येथे चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान सोहेल रफिक सोळखी (२९), युसुफ युनुस खान (२०), अरबाज शाहिद शेख (२२), गौसिया इस्थेखात शेख (२२) आणि गौरी प्रमोद कांबळे (३२) या आरोपींना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी बनावट नावाने ग्राहकांना कॉल करून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करत होते. या छाप्यात ६ कॉम्प्युटर सेट, ६ लॅपटॉप, २७ मोबाईल हँडसेट, २३ सिम कार्ड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी भादवि कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) आणि आयटी ऍक्ट ६६(क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मुख्य आरोपी सोहेल रफिक सोळखी याला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त युसुफ सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, सपोनि काळे, सपोनि पाटील आणि चुनाभट्टी निर्भया मोबाईल पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon