वाहनांच्या काचा फोडून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Spread the love

वाहनांच्या काचा फोडून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

ठाणे – ठाणे शहरातील वाहनांच्या काचा फोडून बॅग व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. ठाणे पश्चिम येथील महापे रोडवरील घोळ गणपती, पूजा पंजाब हॉटेल जवळ या आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना पकडण्यात यश मिळाले. गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महापे रोडवर संशयित हालचाली करणाऱ्या दोन इसमांवर लक्ष ठेवले. पोलिसांना पाहताच दोघे जण मोटारसायकलवरून नवी मुंबईच्या दिशेने पळू लागले असता पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत त्यांना वाशी, सेक्टर ११, दर्शन लॉजजवळ पकडले. पोलिसी चौकशीत त्यांनी आपली नावे अरविंद दिनेश जाटव (वय २६ वर्षे) आणि साहिल कुमार रमेशचंद्र जाटव (वय २४ वर्षे) अशी सांगितली. हे दोघेही मूळचे राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील असून सध्या ते नवी मुंबईतील दर्शन लॉज, जुहू नगर, वाशी येथे वास्तव्यास होते. आरोपींनी ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी अशा प्रकारचे चार गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी शिळ डायघर, खारघर, पनवेल तालुका आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांच्या काचा फोडून बॅगा चोरण्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, वाहनांच्या काचा फोडण्यासाठी वापरण्यात येणारे ब्रेकर, चोरलेल्या बॅगा, कागदपत्रे आणि पेपर स्प्रेच्या बाटल्या जप्त केल्या. शिळडायघर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३ (२), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही यशस्वी कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, शोध-१ विभागाचे सपोआ शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि सचिन गायकवाड, सपोनि यादव, पोउपनिरीक्षक घुगे, पाटील, नाईक, तसेच पोलीस अंमलदार सुनिल माने, सोनकडे, प्रशांत निकुंभ, धनंजय आहेर, शशिकांत सावंत, सागर सुरळकर, मयुर लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे ठाणे व नवी मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांनी वाहनचोरी आणि बॅग लिफ्टिंगच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon