बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई; अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love

बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई; अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई – मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ ने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. मुंबईच्या बोरीवली पश्चिम येथील वजीरा नाका परिसरात एका इमारतीत अनधिकृत कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने संपर्क साधला जात होता. कॉल सेंटरमधील आरोपी ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून बोलत असल्याचे भासवत होते. नंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जात होती.

दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हे शाखेच्या कक्ष-१२च्या पथकाने छापा टाकून चौघा आरोपींना अटक केली. या कारवाईत ६ लॅपटॉप, २० मोबाईल, २ राऊटर, ६ हेडफोन्स आणि रुपये २.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायसंहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि टेलीग्राम अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-१२ करत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मिना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण – १) विशाल ठाकूर, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-उत्तर) राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहायक पोलीस निरीक्षक विजय रासकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती निलोफर शेख, तसेच सफौ. लक्ष्मण बागवे, सफौ अल्ताफ खान, पोह.कल्पेश सावंत, पोह. लिम्हण, पोह चव्हाण, पोह. शैलेश बिचकर, पोह. विशाल गोमे, पोह. प्रसाद गोरुले, पोह. शैलेश सोनावणे, पोशि. अरूण धोत्रे, आणि पोशि. चंद्रकांत शिरसाठ यांनी मोलाचे योगदान दिले. सर्व अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य करून ही मोहिम यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon