दादरमधील हॉटेलवर क्राईम ब्रँचची कारवाई; १० कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, दोघे अटकेत
मुंबई – मुंबई गुन्हे शाखा, बांद्रा युनिट ९ ने दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील समर लँड गेस्ट हाऊस हॉटेलमध्ये रात्री धाड टाकली असता या कारवाईत १० .०८ कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.
अटक आरोपींमध्ये सेनुल जुलुम सैख (२८) व जहांगिर शहा आलम सैख (२९), रा. गोवंडी यांचा समावेश आहे. गुप्त माहितीनुसार पोलिसांना ड्रग्स तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस आधीच पोलिसांनी हॉटेलमध्ये खोली बुक केली. खबऱ्याच्या मदतीने ड्रग्स डिलरना हॉटेलमध्ये बोलवण्यात आले.ते ड्रग्स घेऊन पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सदर कारवाई माटुंगा पोलीस ठाण्यात नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे. जहांगिर शहा हा गोवंडीतील रहिवासी असून त्याला खबऱ्याने सापळ्यात अडकवून हॉटेलमध्ये बोलावले आणि नंतर अटक करण्यात आली, मात्र जहांगीर यास अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करीत आहेत.