बीड पुन्हा हादरलं! तुझाही देशमुख करू म्हणत आंधळेच्या पोरांकडून होमगार्डवर कोयत्याने वार, डोक्याला ८ टाके
योगेश पांडे/वार्ताहर
बीड – मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत आहेत. मात्र अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. जवळपास दोन महिने झाले तरी पोलीस यंत्रणा त्याला अटक करू शकलेली नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून बक्षिसही जाहीर केलं आहे. मात्र अजूनही त्याचा काही पत्ता लागलेला नाही. अशातच बीडमधील धारूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी होमगार्ड असलेल्या अशोक माहिते या तरूणावर कोयत्याने वार केले. अशोक मोहिते असे जखमी तरुणाचे नाव असून या प्रकरणात वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघा विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाल्मिक कराड, मुंडे साहेबांच्या बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयता घातला. या हल्ल्यामध्ये अशोक माहिते हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता त्याला लातूरच्य दवाखान्यामध्ये हरवण्यात आलं आहे. या तरुणाच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपींनी कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले होते. त्याचा बर्थ डे साजर केल्याची माहिती अशोक मोहितेच्या गावातील तरूणाने दिली.
बुधवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली, त्यावेळी तो मोबाईल फोन पाहत होता. तेव्हा वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याला कराड आणि मुंडे साहेबांच्या बातम्या का पाहतो असा प्रश्न करत दोघांनी त्याच्या डोक्यात वार केले. आता लातूरच्या दवाखान्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या आरोपींना अटक झाली पाहिजे. कृष्णा आंधळेला वाढदिवस करायला हे दोघे असल्याचं अशोक माहितेच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, जो कृष्णा आंधळे गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे, त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. यावरून या पोरांनी आंधळे कुठे आहे हे माहिती असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.