पनवेलमध्ये प्रियकराकडून रागाच्या भरात प्रेयसीवर चाकूने हल्ला; प्रेयसीचा जागीच मृत्यु तर आत्महत्येचा प्रयत्न करणारा प्रियकर गंभीर जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
पनवेल – फेब्रुवारी महिना हा अनेकांसाठी प्रेमाचा उत्सव असतो. पाश्चात्य संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारा व्हॅलेंटाईन भारतात पण रूजला आहे. १४ फेब्रुवारीचे वेध अनेकांना लागले आहेत. पण या प्रेम प्रकरणाचा वाईट अंत या दिवसापूर्वीच झाला. पनवेलमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात केलेले कृत्य त्याचे आणि तिचे आयुष्य उद्धवस्त करून गेले. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. नवीन पनवेलमधील २२ वर्षाचा निकेश शिंदे याचे प्रेम प्रकरण सुरू होते. पण दोघांमध्ये खटके उडाले आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाले. आपली प्रेयसी कुणाशी तरी बोलते असा त्याला संशय होता. त्याच्या या संशयाच्या भुताने दोघांमधील वाद वाढला होता. ब्रेकअप नंतर पण निकेश तिच्यावर पाळत ठेवून होता.
तू कोणाशी बोलते असा जाब विचारण्यासाठी निकेशने थेट प्रेयसीचे घर गाठले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी निकेशने सोबत चाकू सुद्धा नेला होता. रागाच्या भरात निकेशने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर निकेशने स्वतःवर चाकूने हल्ला केला. त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी निकेश शिंदे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांकडून होत असलेल्या गुन्ह्यावर चिंता व्यक्त होत आहे. प्रेयसीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्यानंतर ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिची हत्या केल्यानंतर आरोपी निकेश शिंदेने स्वतःच्या गळ्यावर त्याच चाकूने वार केला. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.