शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृत्यू; काकूसहित सर्वांना अटक करून फाशी देण्याची मागणी
योगेश पांडे/वार्ताहर

पालघर – शिवसेनेचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. गुजरातच्या भिलाड येथील एका खाणीत अशोक धोडी यांची कार आधी सापडली. ही कार खोल पाण्यात होती. ती कार पोलिसांनी बाहेर काढली. त्यानंतर त्या कारची पाहणी केली असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला. अशोक धोडी हे गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु होता. अशोक धोडी यांच्यासोबत घातपाताची घटना तर झाली नाही ना? असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. अशोक धोडी यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा मुलगा आकाश धोडी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आकाश यांनी सर्व – आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. “अविनाश धोडी फरार आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक करावी. बाकीच्या आरोपींना चालता येणार नाही इतकं टॉर्चर करा. क्राईम ब्रांच आणि एसीबी यांना माझी विनंती आहे, आम्हाला न्याय द्या. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. नाहीतर त्यांच्यापासून आगामी काळात संपूर्ण गावाला, पालघर जिल्ह्याला धोका आहे. एवढी प्लॅनिंग करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज चुकवले आहेत”, अशी प्रतिक्रिया आकाश धोडी यांनी दिली.
अशोक धोडी हे कामानिमित्त १९ जानेवारीला मुंबईत गेले होते. त्यानंतर धोडी हे २० जानेवारीपासून बेपत्ता होते. सगळीकडे पाहिल्यानंतरही अशोक धोडी यांचा शोध लागत नसल्याने अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणात अविनाश धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी हाच मुख्य संशयित आरोपी आहे. अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनीच अविनाश धोडी याच्यावर संशय व्यक्त केला. त्याच्या अवैध दारु तस्करीला अशोक धोडी यांचा विरोध होता. अशोक धोडी दारु तस्करीला अडचण ठरत असल्यानेच अविनाशने आपल्या मोठ्या भावाचं अपहरण केल्याचा कुटुंबियांना संशय होता. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली होती. तर ५ जण फरार होते. त्यांचा शोध सुरु होता. दुसरीकडे अशोक धोडी यांचादेखील शोध सुरु होता. पोलिसांना तपासा दरम्यान अशोक धोडी यांची कार झाई-बोरीहाव मार्गावर सीसीटीव्हीत कैद झालेली दिसली होती. पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आपला तपास पुढे नेला. अखेर ते भिलाड येथे बंद दगड खाणीपर्यंत जाऊन पोहोचले. इथेच अशोक धोडी यांचा त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला.