धक्कादायक ! सोलापूरात आठवीच्या विद्यार्थ्यांने बंदुकीने घातली डोक्यात गोळी
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – राज्यात कधी काय होईल, कुणी काय करेल याची शाश्वती राहिलेली नाही. सोलापूरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका मुलानं बंदुकीने आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या या १४ वर्षांच्या मुलाचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीधर गणेश नष्टे हा माढ्यातील आढेगावचा रहिवासी आहे, तो आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याने बंदुकीची गोळी डोक्यात झाडून आत्महत्या केली आहे. त्याचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचं लायन्सस जम्मू काश्मीरचं आहे. त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली. शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेनं नष्टे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान श्रीधरने नेमकी आत्महत्या का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.