भंडारा येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू तर मृतांची संख्या वाढण्याची भीती
योगेश पांडे/वार्ताहर
भंडारा – भंडारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला असून त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला. दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले. आयुध निर्माण कारखान्यातील या स्फोटाने नागरीक भेदरून गेले. या स्फोटाचे कारण काय आहे हे समोर आलेले नाही. या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. या भीषण स्फोटाने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.