भाजप आमदार कुमार आयलानी यांना पुत्रशोक, सुपुत्र धीरज आयलानी यांचे दीर्घ आजाराने निधन; कुटुंबावर शोककळा
योगेश पांडे/वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कुमार आयलानी यांचे सुपुत्र धीरज आयलानी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते प्रख्यात उद्योजक होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती आयलानी कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी दिली. धीरज आयलानी यांच्या निधनामुळे आयलानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुमार आयलानी यांच्या राजकीय कारकिर्दीत धीरज यांचा मोठा वाटा होता. ते समाजसेवेसाठी सतत तत्पर असणारे उद्योजक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
कुमार आयलानी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकी भूषवली. २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. मात्र, २०१९ आणि २०२४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर आमदारपदी निवडून आले आहेत.