क्रूर गुन्ह्यांमुळे कल्याण-डोंबिवली परिसर कलंकित, पोलीसांकडून वर्षभरातील गुन्ह्यांची यादी समोर

Spread the love

क्रूर गुन्ह्यांमुळे कल्याण-डोंबिवली परिसर कलंकित, पोलीसांकडून वर्षभरातील गुन्ह्यांची यादी समोर

एकूण ३०४४ गुन्हे दाखल तर २३७३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश; १ कोटी ५१ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून तो नागरिकांना परत करण्याचे नियोजन

योगेश पांडे/वार्ताहर

कल्याण – खडकपाडा येथील शुक्ला कुटुंबाकडून देशमुख कुटुंबाला झालेली मारहाण असो किंवा फूस लावून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यार अत्याचर करून केलेली हत्या असो, क्रूर गुन्ह्यांच्या या घटनांमुळे कल्याण-डोंबिवली परिसर सध्या प्रचंड गाजत असून त्यामुळे नागरिकही दहशतीत जगत आहेत. हे कमी की काय म्हणून आता या दोन शहरांतील गेल्या वर्षभरातील गुन्ह्यांची भलीमोठ्ठी यादीच समोर आली असून जवळपास तीन हजारपेक्षा जास्त गुन्हे झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहर, घरफोड्या, खून अशा एकाहून एक निर्घृण गुन्ह्यांचा समावेश आहे. वर्षभरात कल्याण-डोंबिवली हद्दीत ३०४४ विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले, अशी माहिती परिमंडल ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस बळ कमी असले तरी ७८% गुन्ह्याची उकल पोलिसांनी केल्याचेही त्यांनी नमूद केलं. गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली हद्दीत ३०४४ विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले असून यातील ७८% म्हणजेच २३७३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे, अशी माहिती डीसीपी झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये १८ वर्षाखालील आणि १८ वर्षावरील महिलांवर बलात्कार, विनयभंगाचे , अपहरण, अशा एकूण ५१४ गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच २१ हत्या , ३२ हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे तसेच १९८ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

गुन्ह्यांची तपशीलवार आकडेवारी खलील प्रमाणे आहे.

महिलांवरील गुन्हे :
१८ वर्षाखालील मुलींवरील बलात्काराचे ६५ गुन्हे दाखल आणि सर्व १००% उघडकीस आले आहेत.१८ वर्षावरील महिलांवरील बलात्काराचे ५८ गुन्हे दाखल सर्व उघडकीस आले.
विनयभंगाचे २३५ गुन्ह्या पैकी २२६ उघडकीस.अपहरणाचे १५६ पैकी १४५ उघडकीस आले आहेत.
हत्येचे २१ आणि हत्येच्या प्रयत्नाचे ३२ गुन्हे सर्व उघडकीस. घरफोडीचे १९८ गुन्ह्या पैकी १२३ उघडकीस.
दारूबंदीचे ४८७ गुन्हे दाखल सर्व उघडकीस आले. एकूण २२. ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश तसेच अंमली पदार्थ प्रकरणांत ५१. ०५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.१९ अग्नीशस्त्रे आणि १३३ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून १ कोटी ५१ लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून तो नागरिकांना येत्या ७ जानेवारीला परत करण्यात येणार आहे.

पोलिसांचे मनुष्यबळ कमी असूनही, पोलीस मित्र आणि दक्ष नागरिकांच्या मदतीने सुरक्षा पुरवण्यात आली, असे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. संघटित गुन्हेगारीविरोधातही प्रभावी कारवाई करण्यात आली असून हद्दपारीचे ७९ प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. एकूणच, कल्याण-डोंबिवली पोलीसांनी गुन्ह्यांच्या उकल आणि सुरक्षिततेच्या बाबतीत प्रभावी कामगिरी बजावल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon