वाल्मीकि कराडच्या सरेंडर नंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरुच
योगेश पांडे/वार्ताहर
केज – खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं आता १४ दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी २ कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली होती. खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात चार आरोपी ताब्यात आहेत. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मात्र अद्यापही मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे. त्यावरुन बीडमध्ये सध्या वातावरण तापलंय. बुधवारी १ जानेवारीला मस्साजोगच्या गावकऱ्यांनी येथील तलावात जलसमाधी आंदोलन पुकारलं. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर असणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हाच मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे सीआयडीच्या पथकाकडून सुदर्शनचा शोध सुरू आहे. याशिवाय संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात तीन आरोपी अद्यापही फरार असून सीआयडीकडून त्यांचा शोध सुरू आहे. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच लपून बसल्याची माहिती आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाल्मिक कराडनंतर तपास यंत्रणांचा फोकस हा या तीन फरार आरोपींवर आहे.