शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात; आयशर टेम्पोने दिली धडक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा मुंबईतील जोगेश्वरी येथील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ कार अपघात झाला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आयशर टेम्पोने वायकर यांच्या वाहनाला धडक दिली. अपघाताच्या वेळी रवींद्र वायकर कारमध्येच होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार, अपघातावेळी टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वायकर यांनी वायकर मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटातील अमोल कीर्तीकर यांचा पराभव करून विजय मिळवला. अलिकडेच रवींद्र वायकर यांनी शिवसेना (उबाठा) मधून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.