गुन्हे शाखेची कारवाई! उल्हासनगर हत्या प्रकरणात आरोपी सचिन दिघे उर्फ बबल्या गजाआड
योगेश पांडे/वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरच्या रेमंड शोरुम समोर शनिवारी २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री पंकज निकम या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेनं सचिन दिघे उर्फ बबल्या याला बेड्या ठोकल्या आहेत. उल्हासनगर कॅम्पसमधील रेमंड शोरूमच्या समोर गहुबाई पाडा आहे. गहुबाई पाड्यात जागरण गोंधळाला आलेला जावई पंकज निकम हा शनिवारी मध्यरात्री रात्री २ वाजताच्या सुमारास दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी नाक्यावर दारुच्या नशेत धुंद असलेला सचिन दिघे उर्फ बबल्या याने त्याला अडवलं आणि लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत खिशातील चाकू काढून गळ्यात घुसवला. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यवर्ती पोलिसांबरोबर संयुक्तपणे उल्हासनगर गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पोलीस पथकाला बबल्याची टीम मिळाली होती.
आरोपी बबल्या हा कल्याण रेल्वे स्थानकात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस कर्मचारी सतीश सपकाळे, सुरेश जाधव, बबन बांडे, अर्जुन मुत्तलगिरी यांच्या पथकाने सापळा रचून बबल्याला ताब्यात घेतलं आहे. अटक करून त्याला मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.