ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
कोल्हापूर – गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूरसह सांगलीला एमडी ड्रग्जची तस्करी करणार्या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सांगलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या ठोकून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा २९ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. अथर्व संजय सरवदे – २४ व संतोष काशीनाथ पुकळे – ३० अशी त्यांची नावे आहेत. शाहू मार्केट यार्डातील वाळू अड्डा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. संशयित सरवदे याने अमली पदार्थांचा साठा शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातून कोल्हापुरात आणला होता. संतोष पुकळे याच्यामार्फत या साठ्याची मार्केट यार्ड येथील वाळू अड्डा परिसरातून सांगलीकडे तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने रात्री उशिरा सापळा रचून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयितांनी पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने दोघांची अंगझडती घेताच अमली पदार्थाची दोन पाकिटे त्यांच्याकडे आढळली. चौकशीअंती जप्त साठा एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने चौकशीची व्याप्ती वाढविली. संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन प्राथमिक चौकशीत समाेर आले आहे. साठा गोव्यातून कोणाकडून उपलब्ध झाला, याची माहिती घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. अमली पदार्थ तस्करीत अथर्व सरवदे याच्या कोल्हापूरसह सांगलीतील साथीदारांचा सहभाग असावा, असा संशय आहे. सरवदे हा सांगली (विश्रामबाग) येथील हॉटेल व्यावसायिकाचा पुत्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास शाहूपुरीचे तपास पथक सांगलीला जाणार असल्याचे ते म्हणाले.