शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, व्यापाऱ्यांमध्ये घबराट

Spread the love

शहापुरात महालक्ष्मी ज्वेलर्सवर गोळीबार, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, व्यापाऱ्यांमध्ये घबराट

योगेश पांडे/वार्ताहर 

शहापूर – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका गोळीबाराच्या घटनेमुळे हादरला आहे. शहापूर शहरातील पंडित नाका येथील बाजारपेठेत असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही शनिवारी रात्री घडली. शहापूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी पंडित नाक्यावरील बाजारपेठेतील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री ९ ते साडे नऊ वाजता दोन अज्ञात मारेकरी मोटरसायकल वरून आले. त्यांनी महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार केला. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्समधील कामगाराच्या छातीत गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे शहापुरात एकच खळबळ उडाली आहे. शहापूरच्या नागरिकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. गोळीबाराच्या घटनेचा निषेध म्हणून रविवारी संपूर्ण शहापूर शहारातील बाजारपेठ बंद करण्यात आले. संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना घटनेचा लवकरात लवकर तपास करा आणि आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. पोलिसांनी ४८ तासात आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान, या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या घटनेवर पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शहापुरात शनिवारी रात्री झालेल्या पंडित नाक्यावरील महालक्ष्मी ज्वेलर्समधील गोळीबारामध्ये दिनेशकुमार चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजले आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकलेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटनेचा योग्य तपास करून, आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांडेल यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon