टिळकनगर पोलिसांची उत्तम कामगिरी; रिक्षात विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत

Spread the love

टिळकनगर पोलिसांची उत्तम कामगिरी; रिक्षात विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत

योगेश पांडे/वार्ताहर 

डोंबिवली – घाटकोपर ते डोंबिवली रिक्षेने प्रवास करत असताना येथील एका महिलेचा १२ लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज असलेली पिशवी डोंबिवलीत उतरल्यावर रिक्षेत विसरली. ही माहिती महिलेने टिळकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घाटकोपर ते डोंबिवली दरम्यानचे रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रण तपासून ऐरोली येथे संबंधित रिक्षा चालकाला शोधले. त्यांच्या रिक्षेतील १२ लाख ९५ हजाराची सोन्याची पिशवी ताब्यात घेऊन ती महिलेच्या स्वाधीन केली. या प्रकरणातील तक्रारदार महिला भारती नागराज कर्केरा या मुळच्या कर्नाटक येथील उडपी शहरातील रहिवासी आहेत. त्या घाटकोपर येथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. तेथून त्या डोंबिवलीत येणार होत्या. गेल्या चार दिवसापूर्वी तक्रारदार महिलेला डोंबिवलीत यायचे होते. त्यांच्या जवळ सोन्याचा मणिहार, सोनसाखळी, बांगड्या, अंगठ्या, रिंगा असा एकूण १२ लाख ९५ हजाराचा ऐवज होता.

एवढा किमती ऐवज घेऊन लोकलने प्रवास करण्यापेक्षा सुरक्षित प्रवास म्हणून तक्रारदार महिलेने घाटकोपर ते डोंबिवली रिक्षेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. गेल्या शुक्रवारी त्या घाटकोपर मधील चिरागनगर येथून रिक्षेने डोंबिवलीत गोग्रासवाडी भागात आल्या. रिक्षेतून उतरल्यानंतर त्यांनी रिक्षेतील आपले सर्व सामान उतरून घेतले. त्यांची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी रिक्षेत विसरली. घरी गेल्यानंतर तक्रारदार महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांना सांगितला. पोलिसांचे एक पथक तातडीने तपासाला लागले. घाटकोपर ते डोंबिवली ज्या रस्त्याने रिक्षा आली. त्या रस्त्यावरील विविध भागातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. या चित्रणातून पोलिसांनी रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक आणि त्या आधारे त्या रिक्षा चालकाची ओळख पटवली. त्यानंतर त्याचा शोध सुरू केला. दिवसभराच्या शोधात पोलिसांनी भारती कर्केरा यांना डोंबिवलीत येथे सोडणारा रिक्षा चालक ऐरोली चिंचपाडा भागातून ताब्यात घेतला. त्या रिक्षा चालकाला विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. रिक्षा चालकाने रिक्षेत हरविलेला महिलेचा सोन्याचा १२ लाख९५ हजाराचा ऐवज पोलिसांना दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या उपस्थितीत तो ऐवज महिलेच्या स्वाधीन करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon