मुंब्रा बायपासवर शुक्रवारी पहाटे ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रकची कंटेनरला धडक; ड्राइवर किरकोळ जखमी

Spread the love

मुंब्रा बायपासवर शुक्रवारी पहाटे ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रकची कंटेनरला धडक; ड्राइवर किरकोळ जखमी

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – मुंब्रा बायपास मार्गावरील टोलनाका परिसरात शुक्रवारी पहाटे ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला. या अपघातामध्ये चालक रियाज अहमद (४८) यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. अपघातामुळे मुंब्रा बायपासवर काहीकाळ वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून हजारो जड-अवजड वाहने उरण जेएनपीटी, रायगड आणि गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. शुक्रवारी गुजरातहून कर्जतच्या दिशेने ट्रक वाहतुक करत होता. हा ट्रक मुंब्रा बायपासवरील टोलनाका परिसरात पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास आला असता, ट्रक चालक रियाज याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकला. या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तसेच रियाज यांनाही डोक्याला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली.

अपघातामुळे रियाज हे ट्रकमध्येच अडकून होते. घटनेची माहिती मिळताच, पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रियाज यांना ट्रकमधून बाहेर काढले. या अपघातामुळे मुंब्रा बायपास परिसरात पहाटे वाहतुक कोंडी झाली होती. पथकाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. त्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon