पुणे तिथे काय उणे? भरदिवसा भाजप आमदारच्या मामाचं अपहरण

Spread the love

पुणे तिथे काय उणे? भरदिवसा भाजप आमदारच्या मामाचं अपहरण

हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे यावेळी तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळत आहे. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं भर चौकातून अपहरण करण्यात आलं आहे. टिळेकरांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आले आहे. एक चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. संबंधित घटना ही सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन जण बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं. त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

बराच वेळ झाल्याने सतीश वाघ घरी आले नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मुलाने शोधाशोध केली. पण वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपस पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आणि त्यांची गाडी कैद झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. आरोपी कोण होते, त्यांचा उद्देश काय होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणी आता काय-काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon