पार्टीत झालेल्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासातच आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अंबरनाथमध्ये गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. एक शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर तरूणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड दहशत माजली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या १२ तासांच्या गुन्हेगाराला बेड्या ठोकत गजाआड केलं. उर्वरित तपास सुरू आहे. तुषार देडे असे मृत तरूणाचे नाव असून समीर वाघे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात तुषार (१८) हा त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता. मात्र त्यावेळी तेथे आरोपी समीर वाघे आला आणि त्याचे शुल्लक कारणावरून तुषारशी वाद झाले. पाहता पाहता त्यांचा वाद वाढला आणि रागाच्या भरात समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डाबी याच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले होते.
त्या दोघांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या वारात जखमी झालेल्या तुषार याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रं वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एमआयडीसी परिसरातून अटक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील, विकास वळवी, चौधरी, बोरसे, खामकर, पोलीस नाईक देवरे, किनारे, पोलीस शिपाई राजगे, मुठे, काकडे, चत्तर, बोडके, गायकवाड आणि दादा वाघमारे यांच्या पथकाने या आरोपीला शोधून काढलं. समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात हत्येच्या ३ घटना घडल्या असून त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.