काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

Spread the love

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर – शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळी गुवाहाटीला पळून गेलेल्या आमदारांमध्ये शहाजी बापू पाटील यांचा समावेश होता. राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय खुन्नस दर्शवणाऱ्या घटना आता मावळल्या आहेत. मात्र, त्यातही सांगोला मतदारसंघात माजी आमदाराच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. काय झाडी, डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर अज्ञाताने दगडफेक केल्याने शिवसेना शिंदे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयसमोरच ही कार लावण्यात आली होती. त्या कारच्या मागील बाजूस असलेल्या काचेवर दगडफेक मारून ती काच फोडण्यात आली आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात नुकतीच तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेना महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पराभव झाला आहे. तर, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपक साळुंखे यांचाही पराभव झाला. येथून बाबासाहेब देशमुख विजयी झाले. त्यामुळे, राज्यात एवढ्या जोरदार संख्याबळाने महायुतीचं सरकार स्थापन झाले असले तरी शहाजी बापू पाटील यांना घरीच बसावं लागलं. त्यातच, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला येथील कार्यालयासमोर आज दुपारी त्यांचा पुतण्या सागर पाटील यांची गाडी अज्ञात तरुणाने दगड मारून फोडली. विशेष म्हणजे या वेळेला कार्यालयात बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. तसेच, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon